वरप ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाला प्रशासन पाठीशी का घालते

Raigad

कागदोपत्री तपासणी, मात्र प्रत्यक्षात कारवाईची प्रतीक्षा!

पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरप येथील विकासकामे व साहित्य खरेदीतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २०२३ पासून झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपसरपंच शोभा पांडुरंग दोरे यांच्यासह सात सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला होता. मात्र, विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल यांनी दोन वेळा दप्तर तपासणी करूनही अद्याप अहवाल सादर केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी नाराजी व्यक्त करत उपसरपंचांसह सात सदस्यांनी १२ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, गणसंख्या अपुरी असल्याचे कारण देत सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा तहकूब केल्याने हा प्रश्न अनुत्तरित राहिला.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दप्तराची दोनदा तपासणी होऊनही अहवाल का सादर झाला नाही? कथित अनियमिततेबाबत प्रशासनाकडून ठोस भूमिका का घेतली जात नाही? असे सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्याशी तीन वेळा संपर्क साधला असता, माहिती उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, सरपंच गावात न राहता मुंबईत राहतात आणि बिल काढण्यासाठीच गावात येतात, असाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून तपासणी अहवाल सार्वजनिक करावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता पंचायत समिती प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.