0%
Tuesday, October 13, 2026

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे यश

शैक्षणिक
 पेण येथील डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या कु. प्राजक्ता संतोष सागवेकर या विदयार्थीनीने मराठी विभाग महाराष्ट्र शासन,  मराठी विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ पुणेव मराठी विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.
ही राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आभासी अर्थात ऑनलाईन पद्धतीने  अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. माझी मराठी हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्रातील 70 कवींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेत प्राजक्ता सागवेकरला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. परीक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ कवी डॉ. केशव देशमुख व ज्येष्ठ कवी खलील मोमीन यांनी पार पाडली.
तिच्या या घवघवीत यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांनी  अभिनंदन केले आहे.
 सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा डॉ विनायक पवार, डॉ. हिरामण टोंगारे व इतर गुरुदेव कार्यकर्त्यांचे प्राजक्ताला मोलाचे मार्गदर्शन लाभले.