पेण : प्रतिनिधी
बेलवडे येथील शबरी वाडीमध्ये गेल्या १६ वर्षांपासून शबरी माता जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव उत्साहात पार पडला.
सकाळी शबरी मातेला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सत्यनारायण महापूजा व गुरुभक्त प्रशांत महाराज मोठे वढावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कीर्तनाला ह.भ.प. गणपत महाराज हिलम आणि ह.भ.प. नामदेव महाराज ढमढेरे यांनी साथ दिली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ व हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
विशेष म्हणजे, बेलवडे येथील शबरी वाडीमध्ये शबरी मातेचे मंदिर असून, ही वाडी व्यसनमुक्तीसाठीही ओळखली जाते. येथील ग्रामस्थ शबरी मातेची श्रद्धेने सेवा करत असून, वाडीतील व्यसनमुक्तीची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
