४४ स्टॉलच्या माध्यमातून महिला उद्योजिकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री; आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पेण : पेण नगरपरिषद आणि इनरव्हील क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी सखी महोत्सवा’ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात तब्बल ४४ स्टॉल उभारण्यात आले असून, अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री सुरू केली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, नगरपालिकेचे विविध सभापती, नगरसेवक तसेच इनरव्हील क्लबच्या संयोगिता टेमघरे आणि क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू, दिवाळी सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ, हस्तकला वस्तू, भेटवस्तू आणि विविध गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. महिलांनी अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने आपली उत्पादने ग्राहकांसमोर मांडली आहेत. ४४ स्टॉलच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला एक नवी दिशा मिळत आहे.
आजच्या काळात महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय उभा करत आहेत. अशा महिलांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
पेण नगरपरिषद आणि इनरव्हील क्लबच्या या संयुक्त उपक्रमामुळे महिला बचत गट व स्थानिक महिला उद्योजिकांना दिवाळीच्या खरेदीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव केवळ खरेदी-विक्रीचे ठिकाण न राहता महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचा उत्सव ठरत आहे.
