पेणमध्ये साखरचौथ गणपतीची प्राण प्रतिष्ठापना

Raigad

। पेण। प्रतिनिधी

पार्वतीच्या बाळा, पायात वाळा… ताशांचा आवाज तर्रर्र झाला अन् गणपती माझा नाचत आला… अशा वाद्याच्या गजरात गणेश विसर्जनानंतर उदास झालेल्या गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आज साखरचौथीच्या गणरायांची विधिवत प्राण प्रतिष्ठा केली.
अनंतचतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना दिड दिवसांसाठी केली जाते. दिड दिवसानंतर या गणपतीचे विसर्जन केले जाते. रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल, अलिबाग विशेषतः पेण तालुक्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
खास करून पेण तालुक्यात गणेशमुर्ती कारागिरांना त्याच्या कामाच्या प्रचंड व्यापामुळे गणेशोत्सवाचा आनंद मिळालेला नसतो म्हणून त्यांनी ही प्रथा सुरु केली. असून आज विविध संस्था, मंडळे, राजकीय कार्यकर्ते या गणेशाची स्थापना करतात. त्यामुळे मुळ उत्सवापेक्षा या उत्सवाचे महत्व वाढत चालले आहे.
यामध्ये सर्वात आकर्षक देखाव्यासाठी पेण तालुक्यातील दोन गावे उंबर्डे व पाटणेश्वर अतिशय नावाजलेली आहेत. अशा प्रकारच्या उत्सवामधून सामाजिक बांधिलकी जपली जाते. त्यामुळे या साखरचौथ गणेशोत्सवासाचे महत्व सर्वत्र वाढत आहे.
पेण शहरात युवा पिढीने साखारचौथीच्या गणेशोत्सवाला आधुनिक रूप देत वेगवेगळे इव्हेंट सादर करून साखरचौथ गणेशोत्सवामध्ये एक नवीन ग्लॅमर आणले आहे. प्रत्येक मंडळाच्या बाप्पांच्या मुर्तीमध्येदेखील आधुनिकता दिसून येत आहे. त्यामुळे या मुर्ती भाविक पेणकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. यंदाच्या साखरचौथ गणेशोत्सवावर जेनझीचा प्रभाव जाणवत आहे. यामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ, प्रेमनगरचा राजा मित्रमंडळ, रामवाडीचा राजा मित्रमंडळ आणि ओरिजनल अष्टविनायक मित्रमंडळ, कासार आळीचा राजा, गुरव आळीचा राजा, बाजारपेठेचा राजा, विठ्ठल आळीचा राजा असे एक ना अनेक राजे पेण शहरामध्ये पहायला मिळतात. यांच्याकडे साकारलेल्या गणेशमुर्तीच्या सजावटीच्या विषयासोबत राजकीय विषयांवरील चर्चाही रंगत आहे. या मित्रमंडळांकडे पेणकर सध्याच्या स्थितीला राजकीयदृष्ट्या नजर ठेऊन आहेत. तसेच पेण शहरात श्री मित्रमंडळ विठ्ठल आळी, जय गणेश मित्रमंडळ बाजारपेठ, ३० नंबर मित्रमंडळ बाजारपेठ, कोळीवाडा मित्रमंडळ (वरची आळी), कुंभार (खालची आळी) आळी मित्रमंडळ, जरीमरी आई मित्र मंडळ कौढाळतळे, गुरूदत्त मित्रमंडळ बाजारपेठ, गुरवआळी मित्रमंडळ, महाकाली मित्रमंडळ, शिक्षक सोसायटी मित्रमंडळ, साई नगर मित्र मंडळ, गोळीबार मैदान मित्र मंडळ, वक्रतुंड मित्र मंडळ इत्यादी गणेशोत्सव मित्रमंडळांनी मोठ्या उत्साहात साखरचौथीच्या गणरायाची स्थापना केली आहे.
पेण तालुक्यातील शिंगणवट गावच्या राजेमित्र मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेली कित्येक वर्षे साखरचौथ गणेशोत्सव व शिमगा महोत्सव करण्यामध्ये यांची एक वेगळी परंपरा आहे. असे राजेमित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले. प्राध्यापक एल.एस. जांभळे यांच्या घरी वर्षभर गणपती बाप्पा असतो. साखरचौथीच्या दिवशी मखरामध्ये दोन गणपती असतात. त्यातील आदल्या वर्षाच्या बाप्पाचे विसर्जन होतो यातील चालू वर्षाचा बाप्पा पुढे वर्षभर एल.एस. जांभळे यांच्या घरात विराजमान असतो यावेळी त्यांनी या बाप्पाची महती सांगितली.
साखरचौथीच्या उत्सवाने एक प्रकारे संपूर्ण कोकणातील गणेशोत्सावाची सांगता होत असते.