पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नवनिर्वाचित झाल्याबद्दल हरिश्चंद्र वसंत पाटील यांचा नागरी सत्कार त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय डंगर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, पेण तालुक्यातील विविध गावांचे आजी-माजी सरपंच, पेण नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हरिश्चंद्र पाटील यांनी खारेपाटातील प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक व प्रयोगशील शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षी भात शेतीमध्ये उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी चतुसूत्री भातशेतीचा प्रयोग राबविला. त्याचबरोबर सूर्यफूल, सुगंधी टरबूज यांसारख्या विविध पिकांचे प्रयोग खारेपाट परिसरात करून त्यातून यशस्वी उत्पादन घेतले.
पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांची सांगड घालत शेतीतून अधिक उत्पादन मिळवून देण्याचा पाटील यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरला. त्यांच्या या प्रयोगशील आणि उल्लेखनीय कृषी कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शेतकरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच नुकतीच त्यांची पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी हरिश्चंद्र पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या हरिश्चंद्र पाटील यांच्या या दुहेरी सन्मानामुळे पेण तालुक्याच्या कृषी क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
