ग्रामसेवक व सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात सदस्य आक्रमक; चौकशी करून कारवाईची मागणी
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरप येथे २०२३ पासून आजपर्यंत विविध विकासकामे व साहित्य खरेदीच्या नावाखाली कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शोभा पांडुरंग दोरे यांच्यासह सात सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी उपसरपंचासह सात सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पेण गजानन लेंडी यांच्याकडे लेखी तक्रार करून ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीतील विविध प्रकारच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा संशय असून, सदस्यांना कोणत्या बाबींवर किती खर्च करण्यात आला याची पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये काही खरेदीच्या पावत्यांमध्ये प्रत्यक्ष साहित्य खरेदी न करता अथवा खर्चाबाबत विसंगती असतानाही रक्कम काढण्यात आल्याचे दिसून आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. काही पावत्यांवर आकडे फुगवून दाखविण्यात आल्याचा तसेच परस्पर ठराव करून खर्च करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व कागदपत्रांसह संबंधित तक्रार प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.
तक्रारदारांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई आठ दिवसांत करावी, अशी मागणी केली होती. मात्र तक्रार करून दीड ते पावणेदोन महिने उलटूनही ठोस कारवाई झालेली नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी विक्राती तांडेल यांनी दोन वेळा वरप येथे चौकशीसाठी भेट दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र चौकशीमध्ये नेमके काय निष्पन्न झाले, याची कोणतीही माहिती उपसरपंच शोभा दोरे यांच्यासह सात सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते खुमा तानाजी दोरे यांना देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थितीच प्रश्नात?
दरम्यान, वरप ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी प्रतिनिधी गेले असता सरपंच गणेश मनये आणि ग्रामसेवक के. पी. पाटील यांची भेट होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत लिपिक अनंत हंबीर यांची भेट झाली. सरपंच आणि ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीमध्ये नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
यामुळे एकीकडे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभाराबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
“कारभाराची चौकशी झालीच पाहिजे”
सामाजिक कार्यकर्ते खुमा दोरे, उमा दोरे तसेच उपसरपंच शोभा दोरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये अनेक बाबी संशयास्पद आढळल्याचा त्यांचा दावा असून, संपूर्ण आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आता वरप ग्रामपंचायतीचा कारभार चांगलाच चर्चेत आला असून, उपसरपंचासह सात सदस्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, सरपंच गणेश मनये आणि ग्रामसेवक के. पी. पाटील यांची या आरोपांबाबत बाजू मिळू शकली नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच चौकशीअंती आरोपांमध्ये तथ्य आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.
