दोन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल; 65 मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत ‘आवाजाची स्पर्धा’, लेझर-डीजेचा दणदणाट
पेण : प्रतिनिधी
पेण शहरातील साखर चौथ गणपती उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. मात्र भक्तीच्या या उत्सवाला यंदा ध्वनीप्रदूषणाच्या कर्णकर्कश स्पर्धेची किनार लाभली. पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 65 सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. प्रत्येक मंडळाचा डीजेचा आवाज इतरांपेक्षा मोठा असावा, अशी जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र विसर्जन मार्गावर पाहायला मिळाले.
सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विसर्जन मार्गावर डीजेच्या दणदणाटासोबतच लेझर लाईटचा झगमगाट सुरू होता. मोठमोठे साउंड सिस्टीम, डीजे आणि लेझरच्या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला. उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली, तरी त्याचवेळी नागरिकांना होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्र्नही चर्चेत आला.
‘आवाज कोणाचा मोठा?’ याचीच जणू स्पर्धा
गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव. मात्र विसर्जन मिरवणुकीत भक्तिगीतांपेक्षा डीजेचा आवाज आणि आवाजाची पातळी यांनाच अधिक महत्त्व मिळाल्याचे दिसून आले. एका मंडळाचा डीजे सुरू झाला की दुसर्या मंडळाकडून त्यापेक्षा मोठा आवाज करण्याचा प्रयत्न होत होता. परिणामी विसर्जन मार्गावरील वातावरणात ध्वनीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली.
पोलिसांची वेळेवर कारवाई
दरम्यान, पेण पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत रात्री बरोबर 10 वाजता डीजे आणि ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करण्याची कारवाई केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार्या कर्णकर्कश आवाजाला आळा बसला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे निर्धारित वेळेनंतर ध्वनिप्रदूषण सुरू राहिले नाही, ही बाब नागरिकांसाठी दिलासादायक ठरली.
मात्र प्रश्र्न असा आहे की, उत्सव साजरा करताना भक्तीचा आवाज मोठा हवा की डीजेचा? श्रद्धेच्या नावाखाली ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडली जात असेल, तर त्यावर मंडळांनी आणि नागरिकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
कोट्यवधींची उलाढाल; पण पर्यावरणाची किंमत किती?
साखर चौथ गणपती उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. व्यापारी, खाद्यपदार्थ विक्रेते, सजावट, विद्युत रोषणाई, साउंड सिस्टीम, वाहतूक आणि विविध व्यवसायांना याचा ङ्गायदा होतो. मात्र या आर्थिक उलाढालीसोबत पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
गणपती बाप्पाच्या उत्सवाची भव्यता ही आवाजाच्या तीव्रतेत नसून भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीत असते, हे पुढील वर्षीच्या उत्सवात सिद्ध करण्याचे आव्हान आता गणेश मंडळांसमोर आहे.
