0%
Monday, October 26, 2026

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पेणच्या नेने कन्या विद्यालयाचे यश!

शैक्षणिक

सहा विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

पेण : प्रतिनिधी

रायगड जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पेण येथील सौ. मनोरमाबाई नारायण नेने कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या सहा विद्यार्थिनींनी सहभाग घेत विविध गटांत यश संपादन केले.

शनिवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन केले. १७ वर्षांखालील गटात कु. गार्गी मोर्वेकर हिने तृतीय क्रमांक, तर कु. गौरी साळविंकर हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. तसेच कु. मिशा म्हात्रे हिने सहावा क्रमांक पटकावला.

१४ वर्षांखालील गटात कु. ईश्वरी कोळेकर हिने तृतीय क्रमांक, तर कु. स्नेहा मुंगडे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. या विद्यार्थिनींच्या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत भर पडली आहे.

या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल पालकांकडूनही कौतुक होत आहे.

या विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक श्री. समीर दिवेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला असून, भविष्यातही त्यांनी क्रीडा क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.