सरेभागच्या पाणी व वीज समस्येवर प्रांत कार्यालयात बैठक; दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठ्याचे आश्वासन

Raigad

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील सरेभाग परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाई आणि वीज समस्येबाबत प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले.
सरेभाग परिसरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) मार्फत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, ही योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याने ऑक्टोबर महिन्यातच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी एमजीपीचे उपअभियंता योगेश पाटील यांना सक्त ताकीद देत, येत्या दोन ते तीन दिवसांत ज्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागापर्यंत पाणी पोहोचविण्याचे निर्देश दिले.
यावेळी वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर यांनी, एमजीपीकडून काम होत नसेल तर ग्रामपंचायत स्वतःच्या खर्चाने काम करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ग्रामपंचायतीच्या या भूमिकेला एमजीपीचे अधिकारी परवानगी देण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर येत्या दोन ते तीन दिवसांत वासखांडीपर्यंत पाणी पोहोचविण्याचे आश्वासन उपअभियंता योगेश पाटील यांनी दिले.
दरम्यान, सरेभाग परिसरातील वीज समस्येवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. महावितरणचे कनिष्ठ अभियंता केतन थत्ते यांनी शेतीची कामे पूर्ण होताच युद्धपातळीवर प्रयत्न करून सरेभाग येथील वीज समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीनंतर एमजीपीचे उपअभियंता योगेश पाटील आणि सरपंच संदेश ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीतील चर्चेची माहिती दिली. आता संबंधित विभाग दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्तता करतात, याकडे सरेभागमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.