गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणाच्या १,६०० हून अधिक रहिवाशांना दिलासा; आमदार विजयबापू शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणा येथील बाह्य जोडरस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, रहिवाशांची एकजूट आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे या रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला असून, येत्या मंगळवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. या दोन्ही निवासी संकुलांतील १,६०० हून अधिक रहिवाशांना दररोज याच बाह्य जोडरस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, शालेय बस तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर या समस्येत अधिकच भर पडत होती.
या प्रश्नासाठी रहिवाशांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने निवेदने देत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर आमदार विजयबापू शिवतारे आणि स्वाती ताई टकले यांच्या सहकार्याने या मागणीला सकारात्मक दिशा मिळाली.
३१ ऑक्टोबर रोजी या महत्त्वपूर्ण निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणा येथील रहिवासी व समुदायाचे प्रतिनिधी एकत्र आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वाकडे जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार विजयबापू शिवतारे आणि स्वाती ताई टकले यांचे रहिवाशांच्या वतीने आभार मानण्यात आले.
रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एकजुटीचा विजय!
हा केवळ रस्त्याच्या कामाला मिळालेला हिरवा कंदील नसून, नागरिकांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नसून संपूर्ण गोडरेज ग्रीन्स, गोडरेज प्राणा आणि परिसरातील नागरिकांचे सामूहिक यश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
