0%
Tuesday, November 10, 2026

नदी अडवण्याचा आदिवासींचा पुढाकार! जांभूळशी आणि बरडावाडीत लोकसहभागातून बंधारे; जलसंधारणाच्या कामाला गती

Raigad

पेण : पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी आता आदिवासी बांधवांनीच पुढाकार घेतला आहे. जांभूळशी आणि बरडावाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून नदीपात्रात बंधारे बांधण्यात आले असून, या बंधाऱ्यांमध्ये साचलेले पाणी पाहून जलसंधारणाच्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

शनिवारी जांभूळशी आणि बरडावाडी या दोन ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करण्यात आली. जांभूळशी येथे संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या उत्साहाने श्रमदानात सहभाग घेतला. तर कोंढाण विभागातील बरडावाडी येथे आदिवासी बांधवांनी एकजुटीने नदीपात्रात बंधारा उभारला. या दोन्ही ठिकाणी बंधाऱ्यांमध्ये साचलेला पाणीसाठा आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.

या कामाची पाहणी करण्यासाठी जयश्री कंपनीचे, पाणी फाउंडेशनचे प्रशांत पाटील तसेच संबंधित संस्थेचे अभियंते उपस्थित होते. त्यांनी बंधाऱ्यांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामाचा आढावा घेतला.

दरम्यान, रविवारी वरप परिसरातील बोरीचा माळ, धायरवाडी, पाहीरमाळ आणि चिचवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये ६० ते ७० फूट लांबीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील जलसंधारणाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे शासन जलसंधारणासाठी विविध उपक्रम राबवत असताना दुसरीकडे आदिवासी बांधव स्वतः श्रमदानातून नद्यांचे पाणी अडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. या संपूर्ण उपक्रमामागे साकव संस्थेची प्रेरणा आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरत आहे.

सरकारच्या योजनांना लोकसहभागाची जोड मिळाली, तर गावागावांत जलक्रांती घडू शकते, याचे जिवंत उदाहरण जांभूळशी आणि बरडावाडीतील आदिवासी बांधवांनी घालून दिले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचा हा सामूहिक प्रयत्न भविष्यात या परिसरासाठी जलसंजीवनी ठरणार आहे.