तीन मजल्यांवरील फ्लॅटचे नुकसान; अग्निशमन दलाच्या गाडीलाही पोहोचताना अडथळे! बिल्डर आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.
पेणमध्ये दिवाळीच्या फटाक्यामुळे लागलेल्या आगीने तीन मजल्यांवरील रहिवाशांच्या संसाराचे मोठे नुकसान केले. मात्र या घटनेने केवळ आगीच्या दुर्घटनेचा प्रश्न उपस्थित केला नसून, शहरातील इमारतींच्या बांधकाम परवानग्या, अतिक्रमण आणि अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. उत्कर्ष नगरमधील सिद्धिविनायक इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचताना अडथळे निर्माण झाल्याची चर्चा आहे. मग अशा इमारतींना बांधकाम परवानगी देताना आपत्कालीन रस्त्यांची तपासणी केली जाते का? आणि दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची?
पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरातील सिद्धिविनायक इमारतीमध्ये ८ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास फटाक्यामुळे आग लागली. इमारतीबाहेर फोडण्यात आलेला फटाका चौथ्या मजल्यावरील प्रेम तेलवणे यांच्या फ्लॅटमध्ये पडल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची झळ पाचव्या मजल्यावरील विजय प्रसाद यांच्या फ्लॅटसह सहाव्या मजल्यावरील अमित विठोबा निंगावले यांच्या फ्लॅटच्या किचनलाही बसली. घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पेण अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेदरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनाला इमारतीपर्यंत पोहोचताना अडथळे निर्माण झाल्याची बाब चर्चेत आली आहे. इमारतीच्या परिसरात अतिक्रमण असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहनाला सहज प्रवेश मिळू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इमारती उभ्या राहताना बांधकाम परवानग्या दिल्या जातात; मात्र त्या इमारतीपर्यंत अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यासाठी पुरेसा रस्ता आहे का? अग्निसुरक्षेचे नियम पाळले आहेत का? मंजूर आराखड्यानुसारच बांधकाम झाले आहे का? या बाबींची प्रत्यक्ष तपासणी होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
त्यामुळे सिद्धिविनायक इमारतीच्या बांधकाम परवानगीची, मंजूर आराखड्याची, संभाव्य अतिक्रमणाची आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित बिल्डर तसेच परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या बचावकार्यात अग्निशमन विभागाचे प्रमुख अभिजीत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पेण पोलीस ठाण्याचे PSI विक्रम नवरखेडे, PSI शिल्पा वेंगुर्लेकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली.
आज सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ताच मिळाला नाही, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पेण नगरपालिकेने या घटनेची केवळ नोंद न घेता इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम परवानग्या, अतिक्रमण आणि अग्निसुरक्षेची चौकशी करावी. कारण नागरिकांचे जीव धोक्यात घालून उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या विकासाला विकास म्हणायचे तरी कसे?
