मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती; नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन आणि क्रीडा साहित्याचे वाटप
पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पेण शहरात उभारण्यात आलेल्या टर्फ क्रिकेट इनडोअर स्टेडियमचे लोकार्पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा पेण नगरपालिकेचे पक्षप्रतोद अनिरुद्ध (छोट्या) पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील या नव्या स्टेडियममुळे स्थानिक क्रिकेटपटूंना सरावासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नगराध्यक्ष प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, पक्षप्रतोद अनिरुद्ध पाटील, नगरपालिकेचे सभापती व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी केदार जाधव यांच्या हस्ते इनडोअर स्टेडियमच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर केदार जाधव आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते फीत कापून स्टेडियमचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे, स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर केदार जाधव आणि आदिती तटकरे यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. दोघांनीही मैदानात उतरून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. या प्रसंगाने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.
यानंतर आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, पक्षप्रतोद अनिरुद्ध पाटील आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांना धनादेश, रोख पारितोषिके तसेच क्रिकेट साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी केले. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतातून पेण नगरपालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रशिक्षकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर गुणवंत खेळाडूंची कमतरता भासणार नाही. खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच १५ जानेवारी २०१७ रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यातील अनेक रंजक आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.
केदार जाधव यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि त्यांच्या बॅटवर स्वाक्षरी घेण्यासाठी लहानग्या क्रिकेटपटूंनी मोठी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला जवळून भेटण्याची संधी मिळाल्याने बालखेळाडूंचा आनंद ओसंडून वाहत होता.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. पेणमध्ये उभारण्यात आलेले हे इनडोअर टर्फ स्टेडियम रायगड जिल्ह्यातील नवोदित क्रिकेटपटूंच्या कौशल्याला नवी दिशा देणारे आणि भविष्यातील क्रिकेटपटू घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
