अवघ्या ४८ तासांत सरेभागात वीजपुरवठा सुरू; महावितरणच्या कामाचे कौतुक

Raigad

पेण : प्रतिनिधी

वाशी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सरेभाग गावात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेऊन सरपंच संदेश ठाकूर यांनी पुढाकार घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अवघ्या ४८ तासांत यश आले असून सरेभाग गावातील वीजपुरवठा नव्याने सुरू करण्यात आला आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पेण प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महावितरणचे अधिकारी, लघुअभियंता केतन थत्ते आणि वाशी शाखा अभियंता संदीप गायकवाड उपस्थित होते. बैठकीदरम्यान केतन थत्ते यांनी दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते.
दिलेल्या आश्वासनानुसार वाशी शाखा अभियंता संदीप गायकवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू केले. सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सरेभाग गावापर्यंत नव्याने विद्युत तारांची जोडणी करण्यात आली, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन विद्युत खांब उभारण्यात आले. अवघ्या ४८ तासांत हे काम पूर्ण करून गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि दिलेला शब्द वेळेत पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कामामुळे सरेभाग ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून संदीप गायकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी वाशी शाखा अभियंता संदीप गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या कामाबाबत माहिती दिली.