भाजप व राष्ट्रवादी एकत्र लढणार, शिवसेनेविषयी आमदार अनिकेत तटकरे यांचा चकार शब्द नाही.
पेण : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष प्रवेश मेळावा पेण येथे महात्मागांधी वाचनालयाच्या सभागृहात झाला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मा. उपसभापती तैलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी पाच महिलांना नव दुर्गा सन्मान आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच रावे, कळवे, दादर, कोपर, बळवली, गोविर्ले या ठिकाणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना मा. आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा विधानसभेच्या निवडणूका ज्या ताकदीने लढलो आहोत त्याच प्रमाणे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढेल. पेणमध्ये भाजप हा थोरला बंधू असून राष्ट्रवादी हा धाकल्या बंधूच्या भुमिकेत आहेत. त्यामुळे वाटाघाटी करून योग्य तो मार्ग काढला जाईल. ज्या प्रमाणे पालीमध्ये आपले पाच नगरसेवक असून ही आपण चार नगरसेवक असणाऱ्या भाजपचा नगराध्यक्ष बसविला तसेच पेणमध्ये कमी जास्त करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेमध्ये योग्य ती वाटाघाटी करून काही झाले तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढणार. मात्र यावेळी आवर्जून मुद्दामहून शिवसेनेचे नाव घेण्यास मा. आमदार अनिकेत तटकरे यांनी टाळले. व कुठेही आपल्या भाषणात शिवसेनेचा उल्लेख केला नाही. यामुळे एक गोष्ट निश्चित की पालमंत्रीपदाचे वाद मिटण्याचा नाव घेत नाही.
तर तैलेश पाटील यांचा प्रवेश हा पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच झाल्याचे बोलले जात आहे. कारण तैलेश पाटील हे अॅड. आस्वाद पाटील यांच्या गटाचे होते. मधल्या काळात आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तैलेश पाटील यांना वेट अॅण्ड वॉचमध्ये प्रवेश ठेवला होता. तैलेश पाटील आज नाही उद्या भाजपमध्ये जातील असेच सर्वांचे राजकीय मत होते. परंतु तैलेश पाटील यांनी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून एक वेगळीच राजकीय खेळी केली आहे. कारण रावे गणात राष्ट्रवादीकडे जिंकेल असा उमेदवार नाही. तैलेश पाटील यांच्या जाण्याने एक जिंकणारा चेहरा राष्ट्रवादी पक्षाला मिळालेला आहे. त्यामुळे तैलेश पाटील यांचा प्रवेश हा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच केलेला आहे. त्यामुळे रावे गणातून पंचायत समितीचे उमेदवार म्हणून तैलेश पाटील हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार असतील यात काही शंका नाही. त्यामुळे पेण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही मिळाल्या तरी, खालील चार ते पाच जागा पंचायत समितीच्या आपल्या पदरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाडून घेणार हे स्पष्ट होत आहे. रावे मधून तैलेश पाटील, जिते मधून दयानंद भगत, गडब डोलवी मधून परशूराम मोकल, वाशी मधून चैत्राली पाटील अथवा विकास पाटील, तर झोतीरपाडामध्ये उदय जवके, हे उमेदवार होउ शकतील. एकंदरीत आजचा पक्ष प्रवेश हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच झालेला आहे हे निश्चित.
यावेळी रितु हरिश्चंद्र पाटील, नलीनी परशुराम पवार, जयश्री अविनाश सावंत, गिता हरिराम भानुशाली आणि जयश्री पाटील या पाच जणीनां नवदुर्गा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी केले तर युवा कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांनी आपले मनोगत मांडले. मोठया उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्यासपिठावर आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत विकास म्हात्रे, गंगाधर पाटील, चैत्राली पाटील, मा उपनगराध्यक्ष वसुधा पाटील, अॅड. मंगेश नेने, विकास पाटील, जितेंद्र ठाकूर, मा. नगरसेवक राजेंद्र वारकर, निवृत्ती पाटील, मा नगरसेविका तेजस्विनी नेने, अमित कुंभार, रिया ठाकूर पाटील, मिनाक्षी पाटील, मुस्कान झट्टाम, सागर हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवेशकर्ते व कार्यकर्ते उपस्थित होते.
