मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे; जमीन द्यायची की नाही, निर्णय शेतकऱ्यांचाच! माजी खासदार धैर्यशील पाटील

Political
सेझ बाधित ४५ गावांच्या शेतकऱ्यांचे पेण प्रांत कार्यालयात २४ तासांचे ‘जवाब दो’ आंदोलन, सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा
सेझ बाधित ४५ गावांतील शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमीन हक्कांच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेण प्रांत कार्यालयासमोर २४ तासांचे लाक्षणिक ‘जवाब दो’ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संबोधित करताना माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी मी कोणत्याही पक्षात असलो तरी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांची भूमिका हीच माझी भूमिका असेल, अशी ठाम भूमिका मांडत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
धैर्यशील पाटील म्हणाले, ज्यावेळी सेझसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या जात होत्या, त्यावेळी जमिनी देऊ नयेत, या भूमिकेतून मी विरोध केला होता. आजही माझी भूमिका तीच आहे. त्यावेळी मी कोणतीही मोठी राजकीय ताकद नसताना आंदोलन केले होते. माझे आंदोलनातील परमेश्वर प्राध्यापक एन. डी. पाटील आणि माजी मंत्री मोहनभाई पाटील हे होते. आंदोलन कसे करायचे आणि अन्यायाविरोधात ठामपणे कसे उभे राहायचे, हे त्यांच्याकडून शिकलो आहे
आंदोलनातून माघार घ्यायची नाही, हे मला माहिती आहे. आज मी कोणत्याही पक्षात असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी माझी बांधिलकी कायम आहे. शेतकरी म्हणतील जमीन द्यायची, तर त्यांच्या निर्णयासोबत राहू, शेतकरी म्हणतील जमीन द्यायची नाही, तर त्यांच्या भूमिकेसोबत उभे राहू, शेतकऱ्यांच्या निर्णयाचा आदर करणे हीच आमची भूमिका आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेण उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सेझ बाधित ४५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी सेझमुक्त करणे, सातबारा उताऱ्यावरील शेती नोंदी कायदेशीर प्रक्रियेद्वारे बदलून घेणे, भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांचे हक्क प्रदान करणे तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीन हक्कांच्या प्रश्नांवर प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनाला आमदार रविशेठ पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. शिवसेनेचे प्रसाद भोईर यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच नंदा म्हात्रे, काशिनाथ पाटील, राजन झेमसे, संदीप पाटील अदी आघाडीवर होते. तसेच विविध पक्षांतील नेत्यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावल्याने शेतकऱ्यांच्या जमीन हक्कांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय एकजूट दिसून आली.
४५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न केवळ कागदोपत्री राहू नये, तर प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा या २४ तासांच्या ‘जवाब दो’ आंदोलनातून देण्यात आला.