नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू केळंबा देवी मंदिर परिसराची स्वच्छता
पेण : प्रतिनिधी
सेवा संकल्प अभियानांतर्गत पेण भाजपच्या वतीने खरोशी येथील स्वयंभू केळंबा देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अभियानाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नारळ वाढवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अॅड. निलिमा पाटील, पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपसभापती संजय डंगर, जिल्हा परिषद सदस्य जर्नादन भस्मा, जोमा दरोडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तसेच तरणखोप सरपंच दर्शना पाटील, अंतोरा सरपंच अमित पाटील आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व खरोशी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत मंदिर परिसरातील कचरा साफ केला. तसेच डस्टर, पाणी आणि इतर साधनांच्या सहाय्याने मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नवरात्रोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने त्यापूर्वी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
सेवा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे नवरात्रोत्सवापूर्वी स्वयंभू केळंबा देवी मंदिर परिसराने स्वच्छतेचे नवे रूप धारण केले.
