ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पुलाचा प्रश्न चिघळला; खरोशीतील नदीपात्रातील भराव हटविण्याचीही मागणी
पेण : प्रतिनिधी
दुरशेत गावातील प्रलंबित पाच मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी पेण येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत अधिकारी सुनिता गांगुर्डे यांच्या कथित चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पुलाच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विशेष म्हणजे, आंदोलनातील पाच प्रमुख मागण्यांपैकी तीन मागण्या थेट ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कामकाजाशी संबंधित आहेत.
दुरशेत येथील पुलाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव करून विरोध दर्शविला होता. मात्र, हा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ११ कोटी रुपयांच्या आसपास निधी मंजूर होऊन कार्यारंभ आदेशही निघाले. ग्रामसभेचा विरोध दर्शविणारा ठराव वेळेत वरिष्ठ स्तरावर पाठविला असता, तर आज निर्माण झालेली परिस्थिती टाळता आली असती, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, २०२० मध्ये ग्रामपंचायतीकडून या पुलाची दुरुस्ती अथवा नवीन पूल बांधण्याबाबत तत्कालीन आमदारांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभेत हा पूल बांधण्यात येऊ नये, असा ठराव मंजूर केला. परंतु हा ठराव वरिष्ठ कार्यालयापर्यंत न पोहोचल्याने पुढील कार्यवाहीत संभ्रम निर्माण झाला. आता पुलासाठी निधी मंजूर होऊन कार्यारंभ आदेश निघाल्याने या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, खरोशी गावाच्या बाजूने नदीपात्रात टाकण्यात आलेल्या भरावामुळे दुरशेत गावाला पुराचा धोका निर्माण झाल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. नदीपात्रातील हा भराव तातडीने हटविण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
पुलाचा प्रश्न, ग्रामसभेच्या ठरावाची दखल न घेणे तसेच नदीपात्रातील भरावामुळे निर्माण झालेला पुराचा धोका या मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान उदय गावंड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ग्रामस्थांची भूमिका मांडली.
