सिडकोचा स्पष्ट नकार; परवानगीशिवाय कनेक्शन घेतल्यास कारवाईचा इशारा, आमदार रविशेठ पाटील यांचे कनेक्शन तोडण्याचे आदेश
पेण : प्रतिनिधी
पेण शहरालगत असलेल्या हावरे बिल्डरच्या पाणी कनेक्शनचा मुद्दा तालुक्याच्या संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीत चांगलाच गाजला. विशेष म्हणजे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी खुलाशांनंतर हावरे बिल्डरचे पाणी कनेक्शन अनधिकृत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला.
प्रांत कार्यालयात आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी उन्हाळ्यातील ५३ गावे आणि २६५ वाड्यांमधील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनांची चर्चा सुरू होती. यावेळी हावरे बिल्डरच्या पाणी कनेक्शनबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एस. देशमुख यांनी हे कनेक्शन त्यांच्या विभागाच्या जलवाहिनीवर नसून सिडकोच्या लाईनवर असल्याचे सांगितले. मात्र, सिडकोचे कार्यकारी अभियंता साईप्रसाद मढवी यांनी हावरे बिल्डरला कोणतेही पाणी कनेक्शन दिले नसल्याचे स्पष्ट केले. परवानगीशिवाय कनेक्शन घेतले असल्यास कायदेशीर कारवाई करून ते तातडीने तोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या खुलाशानंतर आमदार रविशेठ पाटील यांनी संबंधित पाणी कनेक्शन तातडीने तोडण्याचे आदेश दिले. एकीकडे पेण तालुक्यातील ५३ गावे आणि २६५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असताना मोठ्या गृहप्रकल्पांकडूनच अनधिकृतपणे पाणी घेतले जात असल्यास ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
बैठकीत वारंवार होणारी जलवाहिन्यांची गळती, बूस्टर पंप, एमजीपीच्या अपूर्ण पाणी योजना आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना यावरही चर्चा झाली.
या बैठकीस माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, विवेक म्हात्रे, मेघा पाटील, अस्मिता मोकल, सुशांत खाकर, कमला पवार यांच्यासह प्रांत अधिकारी प्रवीण पवार, गटविकास अधिकारी गजानन लेंडी तहसीलदार तानाजी शेजाळ, कृषी अधिकारी सागर वाडकर, एमजीपीचे संदीप पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे एस. एस. देशमुख, सिडकोचे साईप्रसाद मढवी आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच काही सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकही उपस्थित होते.
