कांदळेपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन

Raigad
१० रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार
पेण : प्रतिनिधी
कांदळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कांदळेपाडा गावात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य मेघा मच्छिंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे गावातील ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य मेघा पाटील यांनी १० रुपयांचे नाणे मशीनमध्ये टाकून २० लिटर पाण्याचा जार भरला आणि जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.
यावेळी कांदळे गावच्या माजी सरपंच मुरलीधर भोईर, मळेघरचे उपसरपंच मच्छिंद्र पाटील, प्रशासक गणपत पवार यांच्यासह कांदळेपाडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्प व गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
उद्घाटनानंतर आयोजित छोटेखानी सभेत परशुराम भोईर, मच्छिंद्र पाटील, मेघा पाटील, गणपत पवार आणि माजी सरपंच मुरलीधर भोईर यांनी मनोगत व्यक्त केले. जलशुद्धीकरण केंद्रामुळे गावातील नागरिकांना माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून, या सुविधेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.