पेणःप्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने युती किंवा आघाडी संदर्भात अनेक पक्षांची चर्चा आणि बैठका अनेक दिवस रंगल्या होत्या. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व राजकीय पक्षांमध्ये युती किंवा आघाडीविषयी अस्पष्टता दिसून आली. अर्थातच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना, शेकाप, उध्दवसेना आणि मनसेच्या उमेदवारांसमवेत काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहून दंड थोपटले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी करत एकूण ९० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये २८ जिल्हा परिषदेसाठी तर ६२ पंचायत समितीसाठी.
शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी पहायला मिळाली. यामध्ये दादर गटातुन वैकुंठ पाटील भाजप, प्रल्हाद पाटील शेकाप, रुपेश पाटील मनसे हे दिग्गज आमने सामने आले आहेत. तर, वडखळमध्ये प्रभाकर म्हात्रे भाजप, समिर म्हात्रे शिवसेना उबाठा, मिलिंद पाटील शिंदे शिवसेना, तर संजय जांभळे शेकाप, हे दिग्गज आमने सामने आले आहेत. महलमिरा डोंगर गटातुन जनार्दन भस्मा भाजप, संतोष भस्मा शिंदे शिवसेना, तर लक्ष्मण निरगुडा शिवसेना उबाठा हे आमने सामने आहेत. जितेमधून ताई जोमा दरवडा भाजप, जयश्री वाघमारे शिंदे शिवसेना, मोहिनी मोरे शेकाप, अरुणा पवार उबाठा हया महिला आमने सामने आल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणि लक्षवेधी लढत म्हणून शिह गटाकडे पाहिले जात आहे. यामध्ये भाजपकडून शर्मिला पाटील, उबाठाकडून पल्लवी भोईर आणि शिंदे शिवसेनेकडून प्रिती कुथे हया तिघी जणी आमने सामने पहायला मिळणार आहेत. एकूण ५ जागांसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत
पेण पंचायत समिती १० गणासाठी एकूण ६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये देखील अनेक दिग्गजांनी उडी घेतली आहे. त्यामध्ये भाजपकडून संजय डंगर, विवेक म्हात्रे, प्रदिप म्हात्रे, स्मिता पाटील, अस्मिता पाटील, सुशांत खाकर, मेघा पाटील, लिना पाटील हे दिग्गज असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रश्मी भगत, सुनीता मोकल, प्रफुल्ल पाटील, पुनम शिंदे अदींचा समावेश आहे. शेकापकडून रणजित पाटील, मोहिनी मोरे, पुजा पाटील, सविता पाटील, योजना पाटील, महेंद्र ठाकूर, ललिता म्हात्रे, अर्दीचा समावेश आहे. तर, उबाठागटाकडून महेंद्र घरत, भगवान पाटील, समीर म्हात्रे, प्रिती पाटील, अदींचा समावेश आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून गजानन म्हात्रे, सोनाली कुन्हांडे, वैजयंती कोळी, गोरखनाथ पाटील, सुजित पाटील, राजेश मोकल, अविनाश चव्हाण, अदींचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पेणचे आमदार रविशेठ पाटील आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे देखील उमेदवारांचे अर्ज भरण्यास उपस्थित होते. एकंदरीत २७ जानेवारी ला खऱ्या लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
