खासदार धैर्यशील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विनामुल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन

Raigad

पेण : प्रतिनिधी

पेण शहरात नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार आहे. राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका सौ. पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या पुढाकारातून तसेच डॉ. जी. डी. पोल फाउंडेशन (वाय.एम.टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रुग्णालय, खारघर-नवी मुंबई) यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन हे विशेष शिबिर राबविण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये पोटाचे आजार, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, मूळव्याध, भगंदर, फिशर, त्वचेचे विकार, पांढरे डाग, सोरायसिस, खाज, सौदर्यविषयक समस्या, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व, पाळीचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक ताण, निद्रानाश, सांधेदुखी, वाताचे आजार, सायटिका, जुना सर्दी-दम्याचा त्रास अशा विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच नेत्र तपासणी, बाल आरोग्य तपासणी, डॉ. केसकर पॅथॉलॉजी तर्फे रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व नागरिकांसाठी मोफत औषध वाटपही केले जाणार आहे. सदरचे शिबिर हे नगरपालिका शाळा क्रमांक ३, कन्या शाळा प्रभु आळी येथे संपन्न होणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन नगरसेविका पल्लवी कालेकर व अहाना पाटील यांनी केले आहे