रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजूशेठ पिचिका यांचा बांधकाममंत्र्यांच्या हस्ते सन्मान
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या तरणखोप-पेण-धावटे मार्गावरील इजिमा क्र. ५६ वरील भोगावती नदीवरील १०० मीटर लांबीच्या उच्चस्तरीय पुलाने राज्यस्तरावर पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुलामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत झाली असून, पेण तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वपूर्ण ठरला आहे. दर्जेदार बांधकाम, तांत्रिक गुणवत्ता आणि कामाची अंमलबजावणी यामुळे या पुलाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याचे मानले जात आहे.
या पुलाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रामेश्वर कन्स्ट्रक्शन, पेणचे राजूशेठ पिचिका यांच्या कामाचेही विशेष कौतुक करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते राजू पिचिका यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
भोगावती पुलाला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे पेणच्या विकासकामाला मिळालेली मानाची पावती असून, या पुरस्कारामुळे पेणच्या सार्वजनिक बांधकाम क्षेत्राची राज्यपातळीवर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. या सन्मानाबद्दल राजूशेठ पिचिका आणि रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
