धायरेश्र्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जेएसडब्ल्युच्या तिसर्‍या टप्प्याला पाठिंबा

Political

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार हा पेण तालुक्यात जेएसडब्ल्यूमुळेः अध्यक्ष शशिकांत पाटील
जमिनीच्या बदल्यात पैसे व नोकरी देणारी एकमेव जेएसडब्ल्यु कंपनीः प्रशांत म्हात्रे उपाध्यक्ष
पेण ः प्रतिनिधी
जेएसडब्ल्यु कंपनीच्या होणार्‍या विस्ताराबाबत पेण तालुक्यासह जिल्हयातून पाठिंबा वाढत असून, जेएसडब्ल्यू कंपनीविरूध्द उगाचच कोल्हेकुही करणार्‍या गाव पुढार्‍यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. 22 ऑगस्ट रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या तिसर्‍या टप्प्याच्या विस्तारा संदर्भात जनसुनावणी होत आहे. या जनसुनावणीसाठी धायरेश्र्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे.
वडखळ येथील साईपुष्प हॉटेल येथे नुकतीच धायरेश्र्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीला या असोसिएशनच्या 120 सदस्यांपैकी जवळपास 90 ते 100 सदस्य हजर होते. यावेळी एकमुखाने त्यांनी जेएसडब्ल्युच्या विस्ताराला सर्व परी मदत करण्याचे ठरवल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांशी बोलताना अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले की, येणारा जेएसडब्ल्यूचा तिसर्‍या टप्प्याचे आम्ही स्वागत करत असून या प्रकल्पामुळे भविष्यात रोजगाराची निर्मिती होणार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा रोजगार पेण तालुक्यासह जिल्हयाला उपलब्ध होणार आहे. आज जर आपण विचार केला तर, पंधरा ते वीस वर्षापूर्वी इथे जी अवस्था होती ती स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये खूप ङ्गरक आहे. या जेएसडब्ल्यू कंपनीमुळेच हा विकास झालेला आहे तर उपाध्यक्ष प्रशांत म्हात्रे यांनी देखील जेएसडब्ल्यू कंपनीबाबत बोलताना सांगितले की, जेएसडब्ल्यू कंपनीचा विस्तार हा काळाची गरज आहे. पूर्वी आमच्या इथली लोक मुंबई येथे कामाला जायची. परंतू, देवाच्या कृपेमुळे जेएसडब्ल्यू कंपनीसारखी लक्ष्मी आमच्या दारात असताना आम्ही कंपनीला मदत न करणे म्हणजे आमच्या सारखे दुर्दैवी आम्हीच तसेच जमिनीच्या बदल्यात पैसे आणि नोकरी देणारी जिल्हयात नव्हे तर राज्यात एकमेव जेएसडब्ल्यू कंपनी ही आहे. या बैठकीसाठी अध्यक्ष शशीकांत पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, सचिव निलेश कोठेकर, खजिनदार गणेश म्हात्रे, तुलसीदास कोठेकर, प्रमोद म्हात्रे, प्रकाश जांभळे, मधुकर म्हात्रे, हेमंत पाटील, जगदीश पाटील, संतोष म्हात्रे, प्रकाश पाटील अदींसह मोठया संख्येने असोसिएशनचे सभासद हजर होते.