चारशे ते पाचशे कुत्र्यांवर निर्बीजीकरणासह रेबीज प्रतिबंधक लसीकरण
पेण : प्रतिनिधी
पेण शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या व उनाड कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील विविध भागांत कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असल्याने नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने ये-जा करणे कठीण झाले होते. याबाबत नागरिकांकडून पेण नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रितम पाटील यांच्या पुढाकाराने पेण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पेण शहरातील कोळीवाडा नाका, देवआळी, कवंडाळ तलावाचा कोपरा, अंतोरा रोड, बौद्धवाडा, फणसडोंगरी, चावडी नाका, नंदीमाळ नाका आदी परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याच्या तक्रारी होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपालिकेने मे. ओमकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाथरी, जि. परभणी यांच्याकडे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम सोपविले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून ही मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना आंबेगाव येथील खत प्रकल्प परिसरात नेण्यात येत आहे. तेथे त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक कालावधी पूर्ण झाल्यावर ज्या परिसरातून कुत्र्यांना पकडण्यात आले, त्याच परिसरात त्यांना पुन्हा सोडण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील दयानंद गावंड यांनी दिली.
पेण शहरातील अंदाजे ४०० ते ५०० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.
