पेणच्या मातीतून उमललेला कोकणचा सुरेल गंध…

Raigad
‘कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा’चा महाराष्ट्रभर जल्लोष!
पेण (प्रतिनिधी)
लाल माती, नारळी-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, डोंगर-दऱ्या आणि सागराची अथांग सोबत… कोकणाच्या या निसर्गसौंदर्याला सुरांची झालर लाभली की मन आपसूकच कोकणच्या मातीशी जोडले जाते. याच कोकणच्या मातीचा गंध आणि पेणच्या कलावंताची सर्जनशीलता घेऊन आलेले ‘कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा’ हे गीत सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्सचा पडलेला पाऊस त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात या गीताची निर्मिती झाली. गीतकार सुरेश हिरामण म्हात्रे, निर्मात्या मेघा सुरेश म्हात्रे, तर संगीतकार अक्षय ठाकूर यांनी या गीताला सुरेल साज चढविला आहे. अश्विनी म्हात्रे, प्रतीक्षा म्हात्रे आणि प्रतीक्षा पाटील यांच्या सुमधुर आवाजाने हे गीत रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
विशेष म्हणजे या गीताचे गीतकार सुरेश म्हात्रे हे पेण तालुक्यातील असून त्यांचे मूळ गाव वडाव आहे. कोकणच्या मातीत वाढलेल्या या कलावंताने आपल्या लेखणीतून कोकणाचे सौंदर्य, माणुसकी आणि मातीतला गंध शब्दबद्ध केला आहे. त्यांच्या लेखणीतून यापूर्वीही अनेक गाणी रसिकांच्या भेटीला आली असून ‘रामदास निघाला प्रवासाला’ हे गीतदेखील विशेष गाजले आहे.
मात्र ‘कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा’ या गीताने लोकप्रियतेचे नवे शिखर गाठले आहे. यूट्यूबवर या गीताला तब्बल ५० लाखांच्या आसपास व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावरील रील्स, शॉर्ट्स आणि विविध व्हिडिओंची संख्या मोजणेही आता कठीण झाले आहे. गावाकडच्या लग्नसोहळ्यांपासून पर्यटनस्थळांपर्यंत आणि तरुणाईच्या सोशल मीडिया रील्सपासून सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत या गाण्याचे सूर घुमताना दिसत आहेत.
पेणच्या कलामातीचा आणखी एक सुगंध
पेण म्हणजे केवळ गणेशमूर्तींची नगरी नव्हे, तर कलाकारांची, साहित्यिकांची आणि सर्जनशीलतेची भूमी. याच कलामातीने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले आहेत. आता याच भूमीतून उमटलेला सुरेश म्हात्रे यांच्या लेखणीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर पडत आहे.
‘कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा’ या गीताने कोकणाला केवळ शब्द आणि सूर दिले नाहीत, तर कोकणच्या आठवणींना, मातीला आणि अस्सल जीवनशैलीला डिजिटल युगातील नवी ओळख दिली आहे. म्हणूनच या गाण्याची लोकप्रियता ही केवळ एका गीताची यशोगाथा नसून, पेणच्या कलामातीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर उमटवलेली आपली मोहोर आहे.
कौलारू माडीच्या सावलीतून सुरू झालेला हा सुरेल प्रवास आता लाखो रसिकांच्या मनाच्या ओसरीवर पोहोचला आहे!