नगरसेविका अफ्रिन अखवारे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

Political

कागदी मोहल्ला–धरमतर रोडवरील नागरिकांची गैरसोय दूर; दर्ग्यावर ये-जा करणाऱ्या भाविकांनाही दिलासा

पेण : प्रतिनिधी
पेण शहरातील कागदी मोहल्ला ते धरमतर रोडदरम्यान सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना ये-जा करताना काही काळ मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या परिसरात गटारांचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने मुख्य मार्गालगतचा रस्ता अडथळ्यात आला होता.
कागदी मोहल्ल्यात हजरत खडेपीर शहा वली यांचा दर्गा असल्याने या ठिकाणी मुस्लिम बांधव तसेच भाविकांची नियमित ये-जा असते. मात्र, सुरू असलेल्या गटाराच्या कामामुळे दर्ग्यावर जाणाऱ्या भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांची तसेच भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे होते.
ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका अफ्रिन अखवारे यांनी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि युवा नेते ललित पाटील यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला. त्यांच्या पुढाकाराने गटाराच्या कामालगत नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे.
या पर्यायी मार्गामुळे कागदी मोहल्ला परिसरातील नागरिकांसह हजरत खडेपीर शहा वली यांच्या दर्ग्यावर ये-जा करणाऱ्या मुस्लिम बांधवांची आणि भाविकांचीही गैरसोय दूर झाली आहे. विकासकाम सुरू असतानाही नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीचा विचार करून करण्यात आलेल्या या तत्पर कार्यवाहीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.