राजूशेठ पिचिका यांच्या रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या दर्जेदार कामाची राज्यस्तरावर दखल; २९ सप्टेंबरला मुंबईत पुरस्कार वितरण
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या तरणखोप–पेण–बोरगाव मार्गावरील इजिमा क्र. ५६ वरील भोगावती नदीवरील १०० मीटर लांबीच्या उचस्तरीय पुलाची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे पेणच्या विकासकामाला राज्यस्तरावर मानाची पावती मिळाली असून, या पुलाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रामेश्वर कन्स्ट्रक्शन, पेणचे राजूशेठ पिचिका यांच्या दर्जेदार कामाचेही विशेष कौतुक होत आहे.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यक्रमात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भोगावती नदीवरील हा पूल केवळ वाहतुकीची सुविधा वाढविणारा प्रकल्प नसून, पेण तालुक्यातील विविध गावांना जोडणारा आणि परिसराच्या विकासाला गती देणारा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. या पुलाचे बांधकाम रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजूशेठ पिचिका यांनी दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले. कामातील गुणवत्ता, बांधकामाची अंमलबजावणी आणि तांत्रिक निकषांची पूर्तता यामुळे या कामाची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याचे या पुरस्कारातून अधोरेखित झाले आहे.
‘काम बोलते आणि गुणवत्ता सन्मान मिळवून देते’ याचा प्रत्यय या पुरस्कारातून आला असून, राजूशेठ पिचिका यांच्या नेतृत्वाखाली रामेश्वर कन्स्ट्रक्शनने पेणच्या नावाला राज्याच्या पातळीवर गौरव मिळवून दिला आहे. स्थानिक पातळीवर दर्जेदार बांधकाम करणाऱ्या या संस्थेच्या कामाची राज्य शासनाकडून झालेली दखल ही पेणच्या बांधकाम क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
या प्रकल्पात जगदीश सुखदेवे, तत्कालीन अभियंता; दामोदर माया पाटील, उपविभागीय अभियंता; विनिता राजेश जवके, स्थापत्य अभियंता; तसेच अनिल महादू भरसाट, शाखा अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान राहिले आहे. पुरस्कार सोहळ्यात या सर्वांचा गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०२५-२६ मधील उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांसाठी ‘उत्कृष्ट रस्ता’, ‘उत्कृष्ट पूल’ आणि ‘उत्कृष्ट इमारत’ अशा विविध विभागांत पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यामध्ये पेण तालुक्यातील तरणखोप येथील भोगावती नदीवरील या पुलाचा समावेश झाल्याने पेणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राजूशेठ पिचिकांच्या गुणवत्तेवर शासनाची मोहोर
भोगावती नदीवरील पुलाचे काम पूर्ण करताना दाखविलेली गुणवत्ता, नियोजन आणि बांधकामातील सातत्य याची दखल आता राज्यस्तरावर घेतली जात आहे. त्यामुळे राजूशेठ पिचिका आणि रामेश्वर कन्स्ट्रक्शनसाठी हा पुरस्कार केवळ सन्मान नसून, पेणमध्ये दर्जेदार विकासकामांची नवी ओळख निर्माण करणाऱ्या कार्याचा गौरव ठरणार आहे.
