कधीकाळी हॉटेलमध्ये सहज मिळणारे पाणी आज २० रुपये लिटरने विकत घेण्याची वेळ; बदलत्या काळात पाण्याची शोकांतिका!
पेण : प्रतिनिधी
‘साहेब, थंड हवं की गरम हवं की साधं?’ हॉटेलमध्ये पाऊल ठेवल्यानंतर वेटरकडून विचारला जाणारा हा प्रश्न आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. मात्र, या प्रश्नामागे दडलेली पाण्याची बदलती कहाणी खरोखरच विचार करायला लावणारी आहे.
एक-दोन नव्हे, तर साधारण दहा-बारा वर्षे मागे जाऊन पाहिले तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहक बसताच टेबलावर पाण्याचे ग्लास आणून ठेवले जात होते. पाणी थंड हवे की साधे, असा प्रश्नही कोणी विचारत नव्हते. पाणी ही गरज होती आणि ते सहज उपलब्ध करून देणे हा हॉटेलच्या आदरातिथ्याचा भाग होता.
मात्र, काळ बदलला आणि पाण्याचे स्वरूपही बदलले. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम विचारले जाते, ‘थंड पाणी हवं की साधं?’ आणि आपणही लगेच उत्तर देतो, ‘थंड नको, साधं आणा!’ पण या साध्या प्रश्नातून एक मोठे वास्तव समोर येते. आज अनेक ठिकाणी साधे पाणीही बाटलीतून विकत घ्यावे लागते. त्यासाठी लिटरमागे २० रुपये मोजावे लागतात.
एकेकाळी सहज उपलब्ध असणारे पाणी आज विक्रीची वस्तू बनले आहे. पाणी हे जीवनावश्यक साधन आहे की बाजारातील उत्पादन, असा प्रश्न आता उपस्थित होतो. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर वाढता ताण, भूजल पातळीत होणारी घट, प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यामुळे बाटलीबंद पाण्याचा वापर वाढत चालला आहे.
विकासाच्या गप्पा मारताना आपण चंद्रावर पोहोचण्याची स्वप्ने पाहतो; मात्र पृथ्वीवर माणसाला सहज आणि स्वच्छ पाणी मिळावे, ही मूलभूत गरजही आज खर्चिक होत चालली आहे. दहा-बारा वर्षांत पाण्याच्या बाबतीत झालेला हा बदल केवळ व्यावसायिक बदल नाही, तर भविष्यातील जलसंकटाची धोक्याची घंटा आहे.
कधीकाळी हॉटेलमध्ये पाणी मागावे लागत नव्हते, आज पाणी पिण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. उद्या अशी वेळ येऊ नये की, पाण्याचा ग्लासही माणसाच्या आवाक्याबाहेर जाईल! हीच आजच्या काळातील खरी शोकांतिका आहे.
