जिल्हयात लाखोंची उलाढाल तर पेणमध्ये गोविंद पथकांचा दही हंडी ङ्गोडण्यासाठी हायटेंशन ड्रामा
पेण:मुस्कान खान
रायगड जिल्हयात अनेक भागांमध्ये दहीहंडी सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी सोहळा हा खर्या अर्थाने आता राजकीय पक्षांचा जनतेसमोर जाण्याचा जणू काही इव्हेंटच झालेला आहे. जिल्हयात दहा हजारा पासून पाच लाखा पर्यत मोठया रक्कमेची बक्षिस ठेवून गोविंदा पथकांना आकर्षण करण्याचा एक सुलभ मार्ग राजकीय मंडळीला सापडला असला तरी या दहीहंडी उत्सवामुळे गावागावांमध्ये एकीचे वातावरण निर्माण होउन एकीचे बळ काय असते हे गोविंदा पथक दाखवत असतात. मानवीमनोरे रचून सयंम, विश्र्वास, शिस्त आणि अंगावर काटा आणण्याचा थरार या उत्सवातून पहायला मिळतो. पुर्ण जिल्हयात मोठया प्रमाणात बक्षिस ठेवून हा उत्सव स्पर्धात्मक दृष्टया साजरा केला गेला.
पेण तालुक्यात ललीत पाटील मित्र मंडळाचा गेली दोन दक्षके भरघोस बक्षिस लावून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदा या मित्र मंडळाच्या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. नियमांचे काटेकोर पालन करून ललीत पाटील मित्र मंडळाने शेवटी चार गोविंदा पथकांमध्ये बक्षिसांची रक्कम विभागून दिली. श्रीराम गडब, रुद्रावतार गोविंदा पथक म्हैसबाड खारपाले, काळंबा देवी गडब, विठाई खारपाले यांच्यामध्ये बक्षिस विभागून दिली तर रुद्रावतार गोविंदा महिला पथक म्हैसबाड खारपाले यांना देखील रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. ललीत पाटील मित्र मंडळाच्या आयोजना मध्ये नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी विशेष मेहनत घेउन शेवटची हंडी फुटेपर्यंत सर्व बाबींकडे बारकाई लक्ष दिले. या मित्र मंडळला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील यांच्यासह राजकीय,सामाजिक आणि शैक्षिण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. ललीत पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष ललीत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी येणार्या गोविंदा पथकांचे विशेष स्वागत करून सन्मान देखील केला. शेवटी नशिबाचा कौल श्रीराम गडब गोविंदा पथकाच्या बाजूने पडल्याने हंडी फोडण्याचा मान श्रीराम गडब या गोविंदा पथकाला मिळाला.
तर वैकुंठ पाटील मित्र मंडळाने ग्रामिण गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने हमरापूर, वाशी नाका, वडखळ या तीन ठिकाणी दही हंडीचे रोख रक्कम 1,11,111 रूपयांचे पारितोषिक ठेवून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हमरापूर येथे विठाई खारपाले यांनी मानाचा हंडीच्या मान पटकला. तर वाशी नाका येथे रुद्रावतार गोविंद पथक म्हैसबाड खारपाले, जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी, विठाबाई गोविंदा पथक खारपाले, श्री राम गडब माचेला, नवेगाव या पाच गोविंदा पथकाने सात थरांची सलामी देउन स्पर्धेत चुरस निर्माण केली होती शेवटी आयोजकांनी पाचही जणांना बक्षिस विभागून दिले.
वडखळ येथील दही हंडी जय हनुमान गोविंदा कोलेटी पथकाने पटकावला. त्यांना रोख रक्कम 1,11,111 रुपये देउन राजेश मोकल यांच्या हस्ते देउन सन्मानित करण्यात आले. वाशी नाका येथे बक्षिस वितरण भाजप उपजिल्हाध्यक्ष मिलींद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर हमरापूर विभागातील तांबडशेत येथील बक्षिस वितरण भाजप उपजिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
