पेण : प्रतिनिधी
पावसाळा संपताच पेण तालुक्यात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी होताना दिसत आहे.
ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून थंड पेये, उसाचा रस, नारळपाणी तसेच लिंबू सरबताचा आधार घेतला जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना या वाढत्या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळ्यानंतर गुलाबी थंडीची चाहूल लागण्याआधीच ऑक्टोबर हिटने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही केली आहे.
