पेण : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सीएफआय युनिट पेणतर्फे धनादेश व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप नुकतेच सीएफआय कार्यालयात करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू प्रमोद म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “बारावीनंतर चार वर्षे परिश्रम करा, पुढील ४० वर्षांचा काळ तुमचा सुवर्णकाळ असेल,” असे सांगितले. कोणतीही नोकरी छोटी-मोठी नसते. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मिळेल ती नोकरी स्वीकारावी. तसेच आई-वडिलांना कधीही विसरू नका, त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नका, त्यांची सेवा करणे हे आपले परमकर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी होण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सांगताना आपले अनुभव भावूकपणे व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएफआयचे सर्वेसर्वा डॉ. किशोर देशमुख यांनी केले. प्रायोजित विद्यार्थी डॉ. ओम पाटील आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थी साज चंदणे यांनी मनोगत व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला, तर पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी वाचनाचा छंद जोपासण्याचे आणि मोबाईलपासून दूर राहण्याचे आवाहन केले. नगरसेवक नीलकंठ म्हात्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पेण नगरपालिकेच्या सभापती कलावती पाटील, सभापती सुनीता जोशी, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेवक भूषण कडू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
