बाप्पांच्या निर्मितीनंतर आता कलाकारांची धावपळ देवीमूर्तीसाठी; हुबेहूब जिवंत भासणाऱ्या मूर्तीना अंतिम साज
पेण प्रतिनिधी
गणेशमूर्ती निर्मितीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर पेणच्या कला केंद्रातील मूर्तिकार आणि कलाकार आता देवीमूर्ती साकारण्यात मग्न झाले आहेत. येत्या रविवारी घटस्थापना होणार असल्याने शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या एकच लगबग सुरू असून, देवीच्या मूर्तीना अंतिम रूप देण्यासाठी कलाकारांची धावपळ सुरू झाली आहे.
पेण म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहतात ते जगभरात प्रसिद्ध असलेले गणपती बाप्पा! मात्र, पेणच्या कलाकारांच्या हातातील जादू केवळ गणेशमूर्तीपुरती मर्यादित नाही. नवरात्रोत्सवासाठी साकारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य आणि आकर्षक देवीमूर्ती हेही पेणच्या कलाविश्वाचे वैशिष्ट्य आहे. देवीच्या चेहऱ्यावरील तेज, डोळ्यांतील भाव, वस्त्रांची नजाकत, दागिन्यांची सजावट आणि मूर्तीचा जिवंतपणा पाहणाऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतो.
गणेशोत्सवासाठी महिनोनमहिने मेहनत घेणाऱ्या पेणच्या कलाकारांना गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाच्या तयारीचे वेध लागतात. तालुक्यातील गावोगावी सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी देवीची प्रतिष्वपना करण्याची परंपरा असल्याने आकर्षक देवीमूर्तीना मोठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी पेणमधील मूर्तिकार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
मातीच्या गोळ्याला आकार देत त्यातून देवीचे रूप साकारणे, रंगांच्या माध्यमातून मूर्तीमध्ये जिवंतपणा आणणे आणि बारकाव्यांतून देवीचे सौंदर्य खुलवणे, ही केवळ कला नसून कलाकारांच्या साधनेचा आविष्कार आहे. मूर्तीच्या प्रत्येक भागावर मेहनत घेताना कलाकार आपले कौशल्य आणि कल्पकता पणाला लावत आहेत. आता बहुतांश मूर्तीच्या कामाने अंतिम टप्पा गाठला असून, रंगकाम, दागिन्यांची सजावट आणि इतर सुशोभीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत.
गणपती बाप्पांच्या रूपातून भक्तांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या पेणच्या कलाकारांचे हात आता आदिशक्तीचे रूप साकारण्यात व्यस्त झाले आहेत. गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर नवरात्रोत्सवाच्या आगमनाने पेणच्या कलाविश्वात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले आहे. बाप्पांच्या निर्मितीने गाजणाऱ्या पेणमध्ये आता देवीच्या आगमनाची चाहूल लागली असून, कलाकारांच्या कुंचल्यातून आणि कुशल हातांतून साकारलेली देवीची विविध रूपे पाहण्यासाठी भाविकही उत्सुक आहेत.
