सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जेरबंद; चोरीची स्कूटी हस्तगत
पेण : प्रतिनिधी
पेण शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पेण पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली असून, मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची स्कूटी हस्तगत केली असून, या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
पेण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी शंकर अर्जुन सातपुते ऊर्फ पाटील (वय २८, रा. खांबेवाडी, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीची एमएच ०६ सीसी ६६०९ क्रमांकाची स्कूटी हस्तगत करण्यात आली आहे.
पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीच्या पूर्वइतिहासाचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिसांनी केली. या पथकात पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.
नागरिकांना आवाहन : आपल्या दुचाकीला अतिरिक्त लॉक लावावे आणि वाहन सुरक्षित ठिकाणी उभे करावे. परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वाहनचोरीची घटना निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पेण पोलिसांनी केले आहे.
