पुढचा नंबर चिंचपाडा रोडचा; आठवडाभरात कारवाई
पेण : प्रतिनिधी
पेण शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. पेण-अंतोरा रोडवरील नरदास चाळ आणि एसटी स्टँडमागील रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या व हातगाड्या हटविण्याची मोहीम आज सकाळपासून अतिक्रमण विभागप्रमुख महेश वडके यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली.
याच परिसरातील अतिधोकादायक आशीर्वाद इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यांत सुरू असलेली फळ व भाजी विक्रेत्यांची दुकानेही तातडीने खाली करण्यात आली.
रुंदीकरणानंतर अवघ्या दीड महिन्यातच रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. येत्या आठवडाभरात चिंचपाडा रोड आणि सरकारी दवाखान्यामागील रस्त्यावरही अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती महेश वडके यांनी दिली.
