पेण :- प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्यात आलेल्या डायलिसिस योजनेचा भाग म्हणून, दिनांक 05 जुलै 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे दोन नव्या डायलिसिस मशीनचे युनिट कार्यान्वित होणार आहे. या उपक्रमामुळे किडनी बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, ही एक स्वागतार्ह बाब आहे.
मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाशराव आबिटकर (शिवसेना), आरोग्य राज्यमंत्री मा. ना. मेघनाताई बोर्डीकर (भाजपा), मा. राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील, पेण-रोहा-सुधागडचे आमदार मा. रवीशेठ पाटील, तसेच अलिबाग-मुरूड-रोहाचे आमदार मा. महेंद्रशेट दळवी यांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे.
सदर कार्यक्रम हा शासकीय आहे. शासनाच्या निधीतून आणि जनतेच्या कराच्या पैशातून राबवला जाणारा असल्याने, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहभागाची अपेक्षा आणि गरज दोन्ही असते. हे सर्व लोकप्रतिनिधी आरोग्यसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने निवडक राजकीय प्रतिनिधींना डावलणे हे फक्त लोकशाही मूल्यांना बाधा देणारे नाही, तर प्रशासन आणि जनतेमध्ये दुरी निर्माण करणारे आहे.
या घटनेद्वारे रायगड जिल्ह्यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा राजकीय हस्तक्षेपाखाली घेतलेला पूर्वग्रहदूषित निर्णय स्पष्ट दिसून येतो. आरोग्य सेवा ही राजकीय स्पर्धेचा विषय नसून ती जनतेच्या हक्काची सेवा आहे हे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे, ही नम्र अपेक्षा.
