अधिकारी बदलला कारवाई झाली
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मुख्य सचिवांकडील तक्रारीनंतर पेण वन विभागाची कारवाई.
पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा व खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील बेसुमार गौण खनिज उत्खननाच्या वाहतुकीसाठी तलाठी सजा दुष्मी-खारपाडा हद्दीतील वनेतर कामास बंदी असलेल्या मौजे घोटमाळ येथील सर्वे नंबर 88/23, 88/24, 88/25, 88/26 महाराष्ट्र वनखाते मधून बनविण्यात आलेल्या बेकायदेशीर रस्ता वनपरिक्षेत्र अधिकारी पेण यांनी दि. 6 जुलै रोजी मोठे चर खोदून सदर रस्ता बंद केला आहे.
मागील सहा महिन्याहून अधिक कालावधीपासून हया बेकायदेशीर रस्त्यावर अवैध्य पध्दतीने गौण खनिजाने भरलेले प्रतिदिन सुमारे तीनशे व साडेतीनशे ओव्हरलोडेड डंपरची वाहतूक होत असताना व गौणखजिन उत्खननासाठी विना परवानगी वृक्षतोड होत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाठकर यांच्या काळात कारवाईस दिरंगाई होत होती. मात्र संतोष ठाकुर यांनी या प्रकारणाचा पाठपुरावा केला. संबंधितानवर कोणत्याही प्रकारची गुन्हे नोंद प्रक्रिया किंवा सदर वन जमिनीतील अवैध्य वाहतूक बंद न केल्याने दि. 29 जुन 2025 रोजी आपले सरकार पोर्टलद्वारे महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभाग सचिवांकडे तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने सोमवारी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी सदर कारवाई केल्याचे समजते. मात्र फक्त रस्ता बंद करुन चालणार नाही तर मागील सहा महिने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्या वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाठकर, वनपाल व वनरक्षक यांची चौकशी करुन त्यांचेवर कर्तव्यात कसूर केले प्रकरणी कारवाई न केल्यास रायगड जिल्हा उप वन संरक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे.
दरम्यान कुलदीप पाठकर यांची बदली झाली. नव्याने रुजू झालेल्या सपना सोनार यांनी लगेचच सर्व बाबीचा सखोल अभ्यास करुन आणि वरिष्ठांच्या आदेशाने अखेर रस्ता बंद केला. मधल्या काळात खाण व्यवसायिकांनी आपली रॉयटी कमी व्हावी म्हणून महसूल मंत्र्यांकडे धाव घेतली होती. परंतू हे खाण व्यवसायिक जर अशाप्रकारे शासनाची फसवणूक करून बेकायदेशीर रित्या वृक्षांची तोड करत असतील तर अशा खाण व्यवसायिकांना महसूल मंत्री आश्रय देतील का? आणि शासनाचा नुकसाना करतील का? हा प्रश्न आता ऐरणीवर येत आहे.
