जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या 400 के.व्ही. भार उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे मनोरे उभारु नयेत, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन ) श्रीकांत गायकवाड.

Raigad

पेण ः प्रतिनिधी
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या 400 के. व्ही. भार वाढविण्याकरिता उच्चदाब पारेशन वाहिन्याचे मनोरे उभारण्यासाठीची पुढील कार्यवाही करु नये. अशी तंबी उप जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिली आहे. 220 के.व्ही.नागोठणे एस.पी.सी.एल. वाहिनीच्या तार (कंडक्टर) बदलण्याचे काम तसेच जे.एस.डब्ल्यू कंपनीला 400 के.व्ही. विद्युत पुरवठा करण्याच्या वाहिनीचे काम करत असताना मनोर्‍याखालील बाधित जमिनीचे व वाहिनीखालील बाधित जमिनीचा मोबदला/नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कानसई ता.रोहा ते कासरुघुंटवाडी (निगडे) ता.पेण या परिसरातील बाधित शेतकर्‍यांची बैठक दि. 08 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3ः00 वाजता मा. श्रीकांत गायकवाड, उप जिल्हाधिकारी (भुसंपादन) यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पार पडली. यावेळी उप जिल्हाधिकारी (भुसंपादन) यांनी महा पारेशन चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अ.उ.दा. उप केंद्र प्रकल्प, उप विभाग ठाणे चे मिथुन रामटेके यांना आदेश देताना सांगितले की, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या 400 के.व्ही.उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे मनोरे व उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे काम करु नये. तसेच बाधित शेतकर्‍यांच्या जमिनीचा प्रथम सर्व्हे करुन व लाईनचे ले आउट प्रसिद्ध करुन बाधित शेतकर्‍यांना सविस्तर नोटीस पंधरा दिवसांत देण्याचे आदेश दिले. यावेळी पेण चे उप विभागीय अधिकारी प्रवीण पवार जे.एस.डब्ल्यू अधिकारी व बाधित शेकडो शेतकरी उपस्थित होते.