अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; नगरपालिका प्रशासनाच्या ठोस कारवाईची गरज
पेण : प्रतिनिधी
ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पेण शहराची रचना पूर्वीच्या काळातील असल्याने शहराचा विस्तार आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे ठरत आहे. त्यातच शहरातील रस्त्यांचे काही प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले असले तरी अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रुंदीकरणाचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच विविध व्यावसायिकांकडून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जागा व्यापली जात आहे. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा पुन्हा कमी होत आहे. परिणामी, रुंदीकरण झालेले रस्तेही अनेक ठिकाणी अरुंद झाल्यासारखे चित्र दिसत आहे.
मिरची गल्लीत तर गर्दी आणि अतिक्रमणाचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील वाढती वर्दळ, रस्त्यालगतची दुकाने, हातगाड्या आणि अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने यामुळे पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे मार्ग काढणे कठीण होत आहे.
शहरातील सार्वजनिक विद्यामंदिरसमोरील परिसर, अंतोरा रोड, नगरपालिका कार्यालय परिसर तसेच धर्मतर रोड या ठिकाणीही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाहने उभी असल्याचे दिसून येते. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेकदा किरकोळ वाहतूक कोंडी निर्माण होते.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांसाठी हा प्रश्न गंभीर ठरत आहे. वाहनांसाठी रस्ता आहे की रस्त्यावर वाहनांसाठी जागा आहे, असा प्रश्न निर्माण होण्याची वेळ आली आहे.
रुंदीकरण पुरेसे नाही; पार्किंगचे नियोजनही हवे
केवळ रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक समस्या सुटणार नाही. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शास्त्रशुद्ध पार्किंग धोरण तयार करण्याची गरज आहे. नगरपालिका प्रशासनाने शहरातील उपलब्ध शासकीय अथवा पालिकेच्या जागांचा शोध घेऊन नियोजित पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करणे, पार्किंगसाठी स्पष्ट पट्टे आखणे, अतिक्रमण हटविणे आणि वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले तर भविष्यात पेण शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाबरोबरच पार्किंगचे नियोजन आणि अतिक्रमणमुक्त रस्ते ही पेण शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पुढील दिशा ठरली पाहिजे.
