पेण पालिकेच्या महिला कौशल्य विकास शिबिराला प्रारंभ

Raigad
माझ्या शहरातील महिलांना सक्षम करणे हे माझे कर्तव्य – नगराध्यक्षा प्रितम पाटील 
पेण   (वैशाली मलबारी)
पेण पालिकेच्या महिला कौशल्य विकास शिबिराला आजपासून नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ झाला आहे. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी बोलताना माझ्या शहरातील माझ्या महिला वर्गाला सक्षम करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू असे सांगितले. यावेळी प्रितम पाटील यांच्या सोबत उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील,महिला व बालकल्याण सभापती कलावती पाटील, बांधकाम सभापती स्मिता माळी, क्रीडा व शिक्षण सभापती आफ्रिन आखवरे, नगरसेविका मालती म्हात्रे, संगीता लाड,पल्लवी कालेकर, सुजाता डाकी,अरुणा पाटील, नगरसेवक अभिराज कडू, निळकंठ म्हात्रे, मितेश शहा, क्षितिज मल्टिपर्पज असोसिएशनच्या शितल माळी आदी उपस्थित होते.
            कौशल्य विकासातून महिलांचे सक्षमीकरण करणे आणि महिलांना स्वावलंबनातून आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणे या उद्देशाने महिला व बालकल्याण सभापती कलावती पाटील यांनी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्याकडे प्रस्ताव मांडल्यानंतर प्रितम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्तुत्य उपक्रमाला पसंती दिल्यानंतर आजपासून या शिबिराचे प्रारंभ करण्यात आले. जिजामाता, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या धाडसी महिला नसत्या तर महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या, मात्र त्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आज महिला चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन शेतीच्या बांधापासून ते देशाच्या सीमेपर्यंत पोहोचल्या आहेत. मग याच महिला आपल्यातील कलागुण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी आम्ही तयार केलेल्या बजेटमध्ये महिलांना झुकते माप दिले आहे. त्यामुळे माझ्या शहरातील प्रत्येक महिला सक्षम होऊन आर्थिक दृष्टिकोनातून माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडत असतानाच कलाकौशल्यातून तिने पैसे कमवावे या दृष्टिकोनातून आम्ही महिलांना हे आरी वर्क, फॅशन डिझाईन, कापडी व कागदी पिशव्या बनविणे आदी प्रशिक्षण देत आहोत असे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी बोलताना सांगितले.
 *चौकट*
महिलांना घरातील काम करत असतानाच फावल्या वेळेत एखादा व्यवसाय करता यावा आणि त्या देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षम व्हाव्यात या उद्देशाने महिलांसाठी प्रशिक्षण देण्याची बाब नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी आणि इतर सहकाऱ्यांनी पसंती दर्शविल्याने आज महिलांना आपण व्यवसायाची संधी महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. व्यवसायातून महिलांनी प्रगती केली तर नक्कीच घरखर्चासाठी त्यांना त्याचा फायदा होणार असू असून आज असंख्य महिलांची नोंदणी झाली आहे. अजूनही अनेक महिलांनी प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना देखील पालिकेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येईल.यंदाच्या झालेल्या आर्थिक बजेटमध्ये महिला व बालकल्याण विभागाला भरघोस निधी उपलब्ध झाला असून त्याचा उपयोग महिलांच्या विकासासाठी केला जाईल.
कलावती पाटील, सभापती – महिला व बालकल्याण समिती, पेण न. पा.